Mandave Bk Bhimjayanti
Mandave Bk BHimjayanti Ustahat

मांडवे बुद्रुक येथे भीमजयंती उत्सव उत्साहात; डॉ. सय्यद यांच्या प्रभावी भाषणाने “भेदभावावर प्रहार, बंधुत्वाचा उच्चार:

भीमजयंतीतून समाजाला नवी दिशा” मांडवे बुद्रुक (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर),

दि. 29 एप्रिल 2026 मांडवे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी नेमक्या 5 वाजता कार्यक्रमाची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत तरुणाईचा जोश, महिलांचा सहभाग आणि समाजबांधवांचा उत्साह पाहण्यासारखा होता. डीजेच्या तालावर नाचत-गात निघालेल्या या मिरवणुकीत कुठेही गोंधळ, आरडाओरडा किंवा असभ्य प्रकार नव्हता. उलट “ही आपल्या बापाची जयंती आहे” या भावनेतून प्रत्येक जण अत्यंत आदराने आणि आनंदाने सहभागी झाला होता. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि सुसंस्कृत राहिले. यानंतर कार्यक्रमस्थळी — जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे बुद्रुक येथे दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पणाचा कार्यक्रम पार पडला. गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँक शाखाधिकारी मा. श्री. भोसले साहेब यांनी केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरित केले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सय्यद यांचे व्याख्यान सुरू झाले आणि त्यांच्या ओजस्वी, थेट आणि विचारप्रवर्तक शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. सुरुवातीपासूनच त्यांनी श्रोत्यांना इतक्या प्रभावी पद्धतीने बांधून ठेवले की संपूर्ण सभागृहात एकाग्र शांतता पसरली . डॉ. सय्यद यांनी आपल्या भाषणात कुरआन, भगवान बुद्ध, संत तुकाराम आणि भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांची सांगड घालत मानवतेचा अत्यंत व्यापक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले, “समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान आहे, ही भूमिका कुरआन मांडते. बुद्ध सांगतात की माणूस कुळामुळे नव्हे, तर शील आणि प्रज्ञेमुळे महान ठरतो. संत परंपरेने ‘भेदभ्रम अमंगळ’ असा स्पष्ट संदेश दिला आहे, तर भारतीय संविधानाने समता आणि बंधुत्वाची मूल्ये अधोरेखित केली आहेत.” त्यांनी विज्ञानाचा दाखला देत सांगितले की रक्ताभिसरण आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे सर्व मानवांमध्ये मूलभूत एकत्व असल्याचे स्पष्ट होते. “माणूस हा माणूस म्हणूनच महत्त्वाचा आहे, त्याची जात, धर्म किंवा पार्श्वभूमी नव्हे,” असे ठामपणे सांगत त्यांनी समाजातील वाढत्या अंधश्रद्धा, द्वेष आणि भ्रष्ट प्रवृत्तीवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांचे भाषण केवळ माहितीपूर्ण नव्हते, तर आत्मपरीक्षण घडवणारे होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महापुरुषांनी दिलेले विचार हे द्वेष पसरवण्यासाठी नव्हेत, तर समाज एकत्र आणण्यासाठी आहेत. आजच्या काळात द्वेषाची नव्हे, तर शांततेची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी गरज आहे.

डॉ. सय्यद यांच्या या प्रभावी मार्गदर्शनाने उपस्थित प्रत्येकाच्या मनावर खोल ठसा उमटवला.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मा. श्री. सुरेश बागुल यांनी केले. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. “गावातील असा एकही घटक नव्हता की ज्याने या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही,” असे सांगत त्यांनी सर्व गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

एकूणच, मांडवे बुद्रुक येथे साजरी झालेली ही भीमजयंती केवळ औपचारिक उत्सव म्हणून मर्यादित राहिली नाही; ती गावाच्या सामूहिक जाणीवेचा, विचारांच्या प्रगल्भतेचा आणि मानवतेच्या मूल्यांचा जिवंत आविष्कार ठरली. मिरवणुकीतील शिस्त, कार्यक्रमातील गांभीर्य आणि प्रत्येकाच्या सहभागातून दिसून आलेली एकजूट यामुळे हा सोहळा वेगळ्या उंचीवर पोहोचला. विशेषतः डॉ. सय्यद यांच्या भाषणातून उलगडलेले समता, बंधुत्व आणि विवेकाचे विचार उपस्थितांच्या मनात खोलवर रुजले, आणि केवळ टाळ्यांपुरते न राहता ते आचरणात आणण्याची प्रेरणा देऊन गेले. ही भीमजयंती म्हणजे फक्त एका महापुरुषाला अभिवादन नव्हते, तर त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची सामूहिक शपथ होती. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन “आपण सगळे एक आहोत” हा संदेश ज्या ताकदीने इथे उमटला, तोच या कार्यक्रमाचा खरा यशस्वीपणा ठरला. त्यामुळे मांडवे बुद्रुकचा हा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता, समाजाला दिशा देणारा आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरणारा एक प्रेरणादायी नमुना म्हणून नोंदवला जाईल.

लेखन व शब्दांकन :

जितेश बागुल
मो. 9970785363
संपादक, वृत्तप्रवाह

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *